कृषिप्रधान भारतामधील महाराष्ट्राचे ग्रामीण भागात शेतीशी निगडीत असलेल्या रेशीम उद्योगातून अनेक शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावले आहे. या उद्योगातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन शहरांकडे जाणारा लोंढा थांबविण्यात काही अंशी मदत झालेली आहे. आज काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी एकात्मिक शेतीचा विचार करणे गरजेचे झाले आहे. यामध्ये इतर पिकांबरोबरच रेशीम उद्योगासारख्या महिन्याला उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेती उद्योगाचा विचार करणे व अंमलात आणणे आवश्यक आहे.
रेशमाचे प्रकार - अळीच्या खाद्य प्रकारावरून रेशमाचे 4 प्रकार पडलेले आहेत. तुती रेशीम, टसर रेशीम, मुगा रेशीम व एरी रेशीम हे ते 4 प्रकार. एकूण रेशीम उत्पादनाचे 90 ते 95 टक्के तुती रेशीमचे उत्पादन घेतले जाते. तसेच रेशमाच्या चारही प्रकारात हे उच्च दर्जाचे गणले जाते. महाराष्ट्रामध्ये तुती रेशीम व टसर रेशीम या दोन प्रकारचे रेशीम उत्पादन घेतले जाते. तुती रेशीम हे पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागातील 24 जिल्ह्यांमध्ये तर टसर रेशीम हे पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या 4 जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. तुती रेशीम उद्योगासाठी लागणारे अंडीपूंजाचे उत्पादन गडहिंग्लज येथे करण्यात येते.
• तुती रेशीम उद्योग - राज्यातील भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम उद्योगासाठी पूरक आहे. उन्हाळ्यातील काही महिने वगळता राज्यातील हवामान तुतीची वाढ जोमाने होण्यास पोषक आहे. यासाठी पर्जन्यमान 600 ते 2500 मि.मि./ वार्षिक तसेच पावसाळ्यात दहा दिवसांतून एकदा 50 मि.मि. पाऊस झाल्यास तुतीची चांगली वाढ होते. यासाठी जमीन ही खोल पाण्याचा योग्य निचरा होणारी, चांगल्या प्रकारे ओलावा टिकवून ठेवणारी व भुसभुशीत असावी. तसेच तापमान 13 ते 40 अंश सेल्सिअस, पाच ते दहा तास सूर्यप्रकाश या बाबी तुती वाढीस पोषक ठरतात.
1. रेशीम उद्योगापासून नियमित शाश्वत उत्पन्न मिळू शकते.
2. एकदा तुती लागवड केली की 12 ते 15 वर्ष लागवडीचा खर्च येत नाही. तसेच एकदा किटक संगोपन गृह बांधले व साहित्य खरेदी केली की पुन्हा खर्च येत नाही.
3. तुती रोपांची लागवड केल्यापासून 3 ते 4 महिन्यात तुती बाग किटक संगोपनासाठी योग्य होते. त्यामुळे इतर व्यापारी पिके अथवा फळ बागेच्या तुलनेत तुती लागवडीपासून उत्पादन कमी कालावधीत सुरू होते.
4. कमी पाण्यातही तुती जगत असल्यामुळे उन्हाळ्यात अथवा दुष्काळात दोन महिने पाणी नसतानाही तद्नंतर मिळालेल्या पाण्यावर बागा पुन्हा उगवून येते.
5. किड व रोग तसेच नैसर्गिक आपत्ती जसे अवकाळी पाऊस, गारपीट पासून बागेस विशेष नुकसान होत नाही.
6. इतर बागायती पिकांच्या तुलनेत तुतीच्या झाडांना पाणी कमी लागते.
7. रेशीम अळ्यांच्या संगोपनासाठी पाला वापरला जात असल्याने तुती बागेस किटकनाशके बुरशीनाशके इत्यादी फवारणी खर्च येत नाही.
8. किटक संगोपन संपल्यावर तुती बागेत उरलेला पाला तसेच अळ्यांनी खाऊन राहिलेला पाला जनावरांना दिल्यास त्यांच्या दुधाच्या प्रमाणात व फॅटसच्या प्रमाणामध्ये वाढ होते. रेशीम उद्योग व शेळीपालन किंवा रेशीम उद्योग व दुध व्यवसाय यासारख्या जोड उद्योगांमध्ये शेतकरी चांगला जम बसवू शकतात.
9. संगोपानातील कचरा, काड्या, अळ्यांची विष्ठा, खाऊन राहिलेला पाला हे कुजवून चांगले खत तयार होते व हा काडीकचरा गांडुळास दिल्यास अतिशय चांगल्या प्रकारचे गांडूळ खत यापासून मिळते.
10.घरातील स्त्रीया, ज्येष्ठ माणसे आपली कामे सांभाळून हा उद्योग करु शकतात तसेच घरातील व्यक्तीद्वारे सहज व सुशिक्षित बेरोजगार यांना करण्यासारखा व 50 ते 60 टक्के महिलांचा सहभाग असणारा उद्योग आहे.
11. रेशीम अळ्यांचे योग्य संगोपन, अळ्यांना पुरेशी जागा व पोषक खाद्य दिल्याने 100 अंडीपुंजाला कमीत –कमी 60 किलो कोष उत्पादन होते.
12. उत्पादित केलेल्या कोषास शासनाचा हमीभाव रु. 178.50 प्रति किलो आहेच परंतु बाजारात त्याची किंमत सरासरी 300 रुपये प्रतिकिलो पेक्षा जास्त आहे. त्यामुळे 100 अंडीपुंजाचे पीक घेतले तर 18000 रुपये तर 200 अंडीपुंजाचे पीक घेतले तर 36000 रुपये एका पिकास 30 दिवसात मिळतात.
13. एका एकर बागेमधून वर्षाला कमीत कमी 4 पिके तर जास्तीत जासत 6 पिके घेता येतात. यावरुन वर्षाला कमीत कमी 1 लाख 20 हजार रुपये उत्पादन मिळते.
14. कोषापासून धागा काढून त्यापासून कापड तयार करणे हा मुख्य भाग असला तरीही याशिवाय कमी प्रतिच्या कोषापासून फुले, बुके, हार, तोरण, वॉल पिस या बाबी तयार करता येतात.
15. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला व्यवसाय.
1. शेतकऱ्यांकडे किमान अर्धा ते एक एकर पाण्याचा निचरा होणारी व आठमाही पाण्याची सोय असलेली जमीन
2. एक एकर तुती लागवडीसाठी 500 रुपये शासकीय नोंदणी फी जमा करावी लागते.
3. नोंदणीसाठी शेतीचा 7/12, 8 अ उतारा, आधार कार्ड, निवडणूक कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते व पासपोर्ट साईजचे दोन फोटो, मनरेगा करीता जॉब कार्ड आवश्यक आहे.
4. तुती लागवड करणे, किटक संगोपन साहित्य खरेदी व आदश्र किटक संगोपन गृह बांधकामाची क्षमता
5. रेशीम उद्योग करण्यासाठी मानसिक तयारी
• रेशीम उद्योगासाठी मिळणाऱ्या सोयी सवलती-
1. शासनामार्फत रेशीम उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, वेळोवेळी प्रत्यक्ष बागेस भेट देऊन तसेच मेळावे, चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात येते.
2. मोफत प्रशिक्षण व अभ्यास दौरे आयोजित करुन शेतकऱ्यांना रेशीम उद्योग विषयी माहिती करुन दिली जाते.
3. म.गा.रो.ग्रा.ह. योजनेमध्ये किटक संगोपन गृह बांधकामासाठी 1000 स्क्वे. फुटासाठी 91863 रुपये, 600 स्क्वे. फुटासाठी 60229 रुपये तर 225 स्क्वे. फुटासाठी 33370 अनुदान देण्यात येते.
4. योजनेअंतर्गत गट रेशीम करिता तुती गट लागवड व किटक संगोपन करिता कुशल व अकुशल कामासाठी तीन वर्षात एकूण 1 लाख 98 हजार 812 रुपये देण्याची तरतूद आहे.
1. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजना :
या योजनेअंतर्गत शासन निर्णय क्रमांक मग्रारो 2014/प्र.क्र.79/रोहयो-5, दिनांक 31 मार्च 2016 अन्वये संपूर्ण राज्यात रेशीम उद्योग विकास योजना राबविणे व रेशीम किटक संगोपन गृह बांधकाम या दोन्ही योजना संयुक्तपणे राबविण्यास मान्यता दिली असून या योजनेमध्ये तुती लागवड, जोपासना, नर्सरी, कोष काढणे याबरोबरच किटक संगोपन गृह बांधकामासाठी अकुशल व कुशल कामाकरिता मोबदला देण्यात येतो.
समोरील माहिती करिता (Project Report) कृषि शास्त्र समुह सोबत संपर्क करावा.
स्त्रोत - - महाराष्ट्र कृषि विभाग