जागतिक कापूस दिन – शाश्वत उत्पादनाची नवी दिशा

blog image

७ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक कापूस दिन (World Cotton Day) हा दिवस कापसाचे जागतिक अर्थव्यवस्थेतील, ग्रामीण उपजीविकेतील आणि शाश्वत शेतीतील महत्त्व अधोरेखित करतो. कापूस हे “पांढरे सोने (White Gold)” म्हणून ओळखले जाते, कारण ते केवळ वस्त्रउद्योगासाठीच नव्हे तर तेल, पशुखाद्य आणि विविध उपउत्पादनांसाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे.

भारतात कापूस हे सर्वात महत्त्वाचे नगदी व तंतू पीक आहे. मात्र हवामान बदल, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर सघन लागवड प्रणाली (High Density Planting System – HDPS) ही अधिक उत्पादनक्षम आणि शाश्वत नफादायक दिशा ठरते.


 सघन लागवड प्रणाली म्हणजे काय?

HDPS म्हणजे अरुंद ओळींच्या अंतरावर कमी उंचीच्या वाणांची लागवड करण्याची आधुनिक पद्धत. या प्रणालीत प्रत्येक झाडावर बोंडांची संख्या तुलनेने कमी असते, परंतु एकक क्षेत्रफळात झाडांची संख्या जास्त असल्याने एकूण उत्पादन वाढते. झाडांची फुलधारणाकालावधी कमी आणि एकसंध असतो. पिके लवकर परिपक्व होतात आणि बोंडांची फुट एकाच वेळी होऊन उच्च गुणवत्तेचा तंतू मिळतो.

साधारणतः २५,००० झाडे प्रति एकर ठेवली जातात. यासाठी ९०x१५ सें.मी., ८०x२० सें.मी. किंवा ७५x२५ सें.मी. अंतर ठेवले जाते.


 जमिनीची मशागत व वाण निवड

जमिनीची योग्य मशागत ही सघन लागवडीची पहिली पायरी आहे. तीन वर्षांतून एकदा खोल नांगरणी करावी. पेरणीपूर्वी १५ दिवस अगोदर २–५ टन प्रति हेक्टर कुजलेले शेणखत जमिनीत मिसळणे उपयुक्त ठरते. पावसाच्या आगमनानंतर २–३ वेळा वखरणी करावी. तण नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी जांभूळवाही वखरणी करावी.

वाण निवडताना कॉम्पॅक्ट, कमी उंचीची, लहान पानांची तसेच पहिल्या स्थानावर बोंड धारण करण्याची क्षमता असलेली वाण घ्यावीत. याशिवाय रसशोषक कीड-रोगांना सहनशील आणि चार ग्रॅमपेक्षा जास्त वजनाची मोठी बोंडे देणारी वाण अधिक फायदेशीर ठरतात.


 पेरणी पद्धत

सुमारे ७५–१०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीसाठी न्यूमॅटिक पेरणी यंत्र वापरल्यास बी योग्य खोलीवर पडते, खतासह पेरणी होते आणि उगवण एकसमान व जोमदार होते. यंत्र उपलब्ध नसेल तर दोन रोपांमधील अंतर राखण्यासाठी १५ सें.मी. लांबीच्या काडीचा वापर करावा.


 अन्नद्रव्य व तण व्यवस्थापन

बागायती स्थितीत बीटी कापसाला १२०:६०:६० कि.ग्रॅ./हे., संकरित कापसाला १००:५०:५० कि.ग्रॅ./हे., तर कोरडवाहू स्थितीत बीटी कापसाला ६०:३०:३० कि.ग्रॅ./हे. प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाश द्यावेत. स्फुरद व पालाश पेरणीवेळी आणि नत्र दोन हप्त्यांत द्यावे – अर्धे पेरणीवेळी व उरलेले ३० दिवसांनी.


तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर २४–४८ तासांत पेंडिमेथालिन फवारावे. सघन लागवडीमुळे जमीन लवकर झाकली जाते आणि तणांचा प्रसार कमी होतो. जर तण वाढले तर पेरणीनंतर २०–३० दिवसांनी क्विझालोफॉप-ईथाईल आणि पायरिथिओबँक सोडियम मिश्रणाची फवारणी करावी.


 पीक वाढ नियंत्रण

सघन लागवडीत झाडांची अनियंत्रित वाढ टाळणे महत्त्वाचे असते. त्यासाठी मेपिक्वॅट क्लोराईड ५% ए.एस. या पीकवाढ नियंत्रकाची २–३ वेळा फवारणी केली जाते. पहिली फवारणी पिक ४०–४५ दिवसांचे असताना, दुसरी १५–२० दिवसांनी आणि गरज असल्यास तिसरी फवारणी करावी. फवारणी करताना जमिनीत पुरेसे ओलावा असणे आवश्यक आहे.


 वेचणी व उत्पादन

सघन लागवडीमुळे बहुतांश कापूस फक्त दोन वेचणीत पूर्ण होतो. त्यामुळे मजुरीचा खर्च कमी होतो आणि वेचणी झाल्यानंतर हरभरा, गहू, मका किंवा मोहरीसारखी रब्बी पिके घेण्यासाठी वेळ मिळतो. वेचणीदरम्यान आणि साठवणीवेळी कापसामध्ये परकीय वस्तू (धागे, पॉलिथिन, केस इ.) मिसळणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी.


 सघन लागवडीचे फायदे

  • पारंपरिक लागवडीपेक्षा २० ते ३०% अधिक उत्पादन मिळते.

  • पिके लवकर परिपक्व होतात, त्यामुळे रब्बी पिकांसाठी वेळ उपलब्ध होतो.

  • गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.

  • लागवड, निंदणी व वेचणीवरील खर्च घटतो.

  • शेतकऱ्यांना अधिक नफा मिळून कापूस उत्पादन शाश्वत बनते.


लेखक: ऋषिकेश गजानन मातळे
(M.Sc. Agricultural Biotechnology)
Young Professional-I, SPC, KVK Akola

स्रोत: तांत्रिक बुलेटिन – केंद्रिय कापूस संशोधन संस्था, नागपूर; कृषी संवादिनी; डॉ. पं. दे. कृषी विद्यापीठ, अकोला


Card image cap
वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
Card image cap
क्षेत्राच्‍या व उत्‍पन्‍नाच्‍या दृष्‍टीने आंब्‍याच्‍या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्‍या उत्‍पन्‍नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे दोन लाख वीस हजार हेक्‍टर क्षेत्र केळीच्‍या लागवडीखाली आहे. केळी उत्‍पादन करणा-या प्रांतात क्षेत्राच्‍या
Card image cap
सीताफळ

संपर्कात रहाण्यासाठी