विदेशातील अभ्यासकांनी देखील केली विद्यापीठाची शिवार फेरी
इंग्लंड मधील मँचेस्टर विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉ एरिना टोझी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे भेट दिली. विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती, कापूस संशोधन आणि विविध प्रात्यक्षिक याबद्दल विस्तृत माहिती घेतली. शाश्वत कापूस शेती यासाठी त्या कार्य करीत आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ सोबत कार्य करण्याची सुद्धा इच्छा त्यांनी मा. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे सोबत बोलतांना प्रदर्शित केली.
मुख्यतः सेंद्रिय पद्धतीव्दारे उत्पादित कापूस पिकासाठी एकत्रित कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. मँचेस्टर विद्यापीठात कापूस पिकाच्या मूल्यवर्धन तसेच कापड तयार करण्यासाठी संशोधन केले जाते, करिता यासाठी एकत्रित कार्य केल्यास कापूस उत्पादक क्षेत्रात याचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी प्रकट केला. यावेळी पुणे स्थित सोपेकॉम या संस्थेच्या निरुती चव्हाण तथा अकोला कृषि विद्यापीठाचे कृषि विषयक आंतरराष्ट्रीय संस्था समन्वयक प्रा. डॉ. नितीन कोंडे आदी त्यांचे सोबत होते.
डॉ. एरिना टोझी यांचा विद्यापीठाच्या शिवार फेरीमधील सहभाग शिवार फेरीची केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याप्ती अधोरेखित करणारा ठरला.